
#येळळूर मराठी साहित्य संघाच्या वतीने मराठी भाषा दिनाचे आयोजन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
भाषेचे ज्ञान हे अक्षरात असते,बोलीभाषेचे जतन करणे गरजेचे असून, मराठी भाषेच्या माध्यमातून सांस्कृतिक भाव विश्व निर्माण होणे गरजेचे आहे. येळळूर साहित्य संघाच्या माध्यमातून मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे काम अविरतपणे सुरू आहे ही कौतुकाची बाब आहे. मराठी भाषा सुंदर व समृद्ध आहे तसेच तिचा गोडवा ही अधिक आहे, तेव्हा प्रत्येक मराठी माणसाने मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे, व ती भाषा समृद्ध करण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असे विचार कवी विजय काळे यांनी काढले. त्यांनी यावेळी अनेक कवितांचे सादरीकरण सुद्धा केले. ते येळळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने श्री शिवाजी विद्यालय येळळूर या ठिकाणी आयोजित मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एम बी बाचीकर होते. तर पाहुणे म्हणून माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, निशांत गांजे उपस्थित होते. प्रा. सी एम गोरल यांनी कार्यक्रम आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचे स्वागत केले. रावजी पाटील यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर साहित्य संघाच्या वतीने माध्यमिक विद्यालय व प्राथमिक शाळांच्या मध्ये मराठी विषय शिकविणाऱ्या शिक्षिका के बी पोटे, विद्या पाटील, शोभा निलजकर, ऐश्वर्या मेणसे, सुरेखा पाटील, प्रशांत सुतार, अजित कांबळे यांचा शाल पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर येळळूरवाडी शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष कृष्णा बिजगरकर, सदस्य सागर काकतकर, वृंदा पाटील, लक्ष्मी पाटील यांचाही शाल, पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी साहित्य संघाचे सचिव डॉ तानाजी पावले, उपाध्यक्ष परशराम बिजगरकर, रमेश धामणेकर, सुभाष मजुकर, शिक्षक संजय मजुकर, एच एस लोकळूचे, एस पी मेलगे, श्रीमती निर्मला कंग्राळकर, ज्योती बुवा, महादेव घाडी यांच्यासह शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सी.एम गोरल यांनी केले. तर आभार डॉ तानाजी पावले यांनी मानले.