
#आम.विठ्ठलराव हलगेकर याची उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर (सुहास पाटील )
तोपिनकट्टी (ता. खानापूर ) येथील श्री महालक्ष्मी ग्रुप एज्यूकेशन सोसायटी संचालित शांतीनिकेतन महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण आणि निरोप समारंभाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री महालक्ष्मीच्या फोटो पूजनाने करण्यात आली. प्रमुख पाहूणे म्हणून खानापूर तालुक्याचे आमदार, संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष श्री विठ्ठलराव हलगेकर, जी. एस. एस. कॉलेजच्या बी. सी. ए. विभागाच्या प्राध्यापिका शिला मेणसे, शांतिनिकेतन महाविद्यालयाचे चेअरमन व जी. एस. एस. कॉलेजचे निवृत्त प्राचार्य बंडू मजुकर, प्रा. विशाल करंबळकर व्यासपीठावर उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या प्राचार्या सुवर्णा निलजकर यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रा. मनिषा भोसले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
प्रमुख पाहुण्या शिला मेणसे यांनी विद्यार्थ्यांना बारावी नंतर कोणकोणत्या क्षेत्रात कार्य करता येते. कोणकोणते कोर्स करता येतात आणि आपलं जीवन उज्ज्वल बनवता येते याचे मार्गदर्शन केले. तेराव्या वर्षांपासून अठराव्या वर्षापर्यंत मुलांचा मानसिक विकास होत असतो. या वयामध्ये मुलांची वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याची जिज्ञासूवृत्ती जागृत झालेली असते. या वयात जी मुले जे चांगलं ते घेतात. तीच मुले पुढे आयुष्यात यशस्वी होतात. त्यामुळे या वयात मुलांनी जे चांगल तेच घेण्याचा प्रयत्न करावा असे प्राध्यापक बंडू मजुकर म्हणाले.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचा योग्य वापर करून येणाऱ्या परीक्षेत यश मिळवावे व भावी आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोनातून वाटचाल करावी. तसेच बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी मुलांना धावपळ करावी लागू नये म्हणून शांतिनिकेतन महाविद्यालयात बी. सी. ए. आणि बी. बी. ए. कोर्सची सुरुवात केली आहे. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी करून घ्यावा. असे आव्हान अध्यक्षीय भाषणात आमदार विठ्ठलराव हलगेकरांनी विद्यार्थ्यांना केले.
या कार्यक्रमात क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच महाविद्यालयातील वाणिज्य व विज्ञान विभागातून आदर्श विद्यार्थी -विद्यार्थिनीची निवड करण्यात आली. त्यांना प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण प्रा. गायत्री पत्री आणि आभार प्रदर्शन प्रा. उज्वला बाचोळकर यांनी केले. या कार्यक्रमाला प्राध्यापकवर्ग, कर्मचारीवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.