
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणे व विश्वा ऑर्ग्यानिक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुलमोहर बँक्वेट हॉल, अभिरुची परिसर धायरी, पुणे या ठिकाणी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात पार पडला.
याप्रसंगी व्यासपीठावर विश्वा ऑर्ग्यानिकचे मॅनेजिंग डायरेक्टर नितीन टिळेकर, सीईओ रूपाली गुरव (मूळगाव हलशी), मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पिटर डिसोझा, अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष सुरेश हालगी, ज्येष्ठ संचालक रामचंद्र निलजकर, लक्ष्मण काकतकर, अशोक पाटील, बीपीएलचे अध्यक्ष दत्ता भेकणे, माजी अध्यक्ष केदार शिवणगेकर आदी उपस्थित होते तर विजय पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला अभिनेत्री सुभाली जोशी आणि महिमा नागमोती यांची विशेष उपस्थिती लाभली. सौ. रमा बाळेकुंद्री यांनी गणेशवंदना सादर केल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर मंडळाचे सचिव शिवाजी जळगेकर यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले.
खानापूर बेळगाव मित्र मंडळ महिला कमिटीची स्थापना!
खानापूर (बेळगाव) मित्र मंडळाच्या माध्यमातून आपल्या पुणेस्थित सर्व महिलांना एकत्र करून त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले ज्याद्वारे महिलांना त्यांच्या समस्या सोडवण्याबरोबरच आपल्या कलागुणांना विकसित करण्यासाठीसुध्दा वाव मिळेल. यावेळी महिलांची कमिटी घोषित करण्यात आली असून सौ. शितल तवर-लाड यांची कार्यकारी अध्यक्षा तर सौ. सुमेधा पाटील-सुळकर व सौ. ज्योती गुरव यांची कार्यकारी उपाध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी विशेष कार्य केलेल्या महिलांचादेखील सन्मान करण्यात आला.
आपले मनोगत व्यक्त करताना नवनिर्वाचित महिला कार्यकारी अध्यक्षा शितल तवर-लाड यांनी मंडळाने महिलांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंडळाचे आभार मानले आणि महिलाही पुरुषांच्या बरोबरीने सामाजिक कार्यात अग्रेसर राहतील अशी ग्वाही दिली. विजय पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महिला दिनानिमित्त उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या आणि महिलांनीही उद्योग, सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रांत स्वतःला कुठेही कमी न लेखता पुरुषांच्या बरोबरीने कार्य करावे असे आवाहन केले. विश्वा ऑर्ग्यानिकच्या सीईओ रूपाली गुरव यांनी आपल्या कंपनीतर्फे महिलांसाठी आणि शेतीसाठी तयार केल्या जाणाऱ्या विविध ऑर्ग्यानिक साहित्याविषयी माहिती देऊन त्या मार्फत महिला कशा गृहीणी ते उद्योजिका बनवू शकतात याची खात्री दिली.
यानिमित्ताने खास महिलांसाठी संगीत, उखाणे, रॅम्प वॉक आणि प्रश्नमंजुषा अशा विविध मनोरंजनात्मक स्पर्धा आयोजित केल्या गेल्या आणि विजेत्या महिलांना पैठणी साडी तसेच विविध गृहपयोगी वस्तू बक्षीस म्हणून देण्यात आल्या. या कार्यक्रमामध्ये साधारणपणे ६०० महिलांनी सहभाग नोंदविला. विश्वा ऑर्ग्यानिक तर्फे उपस्थित सर्वांना भेटवस्तू देण्यात आल्या. मंडळाचे सहसचिव परशराम निलकर यांनी शेवटी आभारप्रदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खानापूर (बेळगाव) मित्र मंडळाचे सर्व संचालक, सभासद, महिला आणि विश्वा ऑर्ग्यानिकचा संपूर्ण स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले.